logo
Breaking News
👉 क्लिक नाशिक न्यूज , प्रेक्षकांचा विश्वास.... आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख.

ना. एकनाथ शिंदेंशी चर्चा; गैरसमज दूर – प्रविण (बंटी) तिदमे यांचा राजीनामा न देण्याचा निर्णय

1

नाशिक : वार्ताहर 
 शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी स्वतः माझ्याशी चर्चा करून सर्व गैरसमज दूर केले असून, मंगळवारी मला व सर्व नगरसेवकांना भेटीस बोलावले आहे. त्यामुळे ना. एकनाथ शिंदे यांच्या स्पष्ट आदेशानुसार आणि जनभावनेचा आदर राखत मी शिवसेना महानगरप्रमुख तसेच नगरसेवक पदाचा राजीनामा देणार नसल्याचे शिवसेना महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.


नाशिक महापालिकेतील उपमहापौर पदाच्या निवडीवरून नाराज होत प्रविण (बंटी) तिदमे यांनी सोमवारी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर ते काही काळ नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. मात्र, पत्रकार परिषदेत तिदमे यांनी खुलासा करत सांगितले की, मी स्वतः नाराज होऊन नॉट रिचेबल झालो नव्हतो. उपमहापौर पदाची उमेदवारी न मिळाल्याने पक्षातील पदाधिकारी व समर्थकांच्या भावना तीव्र होत्या. सतत फोन व भेटीगाठींमुळे सर्वांच्या भावना समजून घेण्यासाठी काही काळ मी संपर्काबाहेर होतो.


या काळात उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्यासह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी माझ्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. स्वतः ना. एकनाथ शिंदे यांनी ‘बंटीवर कोणताही अन्याय होणार नाही’ असा ठाम निरोप कुटुंबीयांमार्फत दिला. तसेच, रविवारी व सोमवारी सकाळी ना. एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भुसे, खा. नरेश म्हस्के, आ. सुहास कांदे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांशी फोनवर चर्चा झाली.


उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारात व्यस्ततेमुळे उपमहापौरपदाबाबतचे लेखी पत्र नाशिकला पाठवता आले नसल्याचे स्पष्ट करत, “तुझ्यावर व इतर नगरसेवकांवर कोणताही अन्याय होणार नाही. मला भेटल्याशिवाय कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नकोस,” असे स्पष्ट आदेश दिल्याचे तिदमे यांनी सांगितले. त्यामुळेच राजीनामा न देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी उद्या मुंबईत होणाऱ्या बैठकीत काही ठोस मागण्या ना. एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडणार असल्याचेही तिदमे यांनी सांगितले. उपमहापौर पदासाठी सव्वा वर्षाचा व गटनेते पदासाठी एक वर्षाचा फॉर्म्युला राबवावा, अशी मागणी पक्षाकडे मांडणार असल्याचे नगरसेविका हर्षदाताई गायकर यांनी सांगितले. सर्व नगरसेवकांचा सन्मान राखून स्थानिक पातळीवर विश्वासात घेऊन निर्णय व्हावा, अशी मागणी नगरसेवक भागवत आरोटे यांनी केली.


पत्रकार परिषदेत तांबोळी बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अझीझ तांबोळी व समाजबांधवांनी ‘राजीनामा देऊ नये’ अशी मागणी करणारे निवेदन तिदमे यांना दिले.
या पत्रकार परिषदेला नगरसेवक, नगरसेविका, महिला आघाडी, युवासेना, विविध सेलचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

0 Comments

Related Posts

How We Can
Help You!

Feel Free to contact us for further assistance regarding Blog, News! We would be glad to assist you further.

Contact Us